नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात येते. पण, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पटेलांवर देखील गंभीर आरोप आहेत. मात्र, पटेलांनी अजित पवारांना भाजपाबरोबर एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता. याला आमदार अमोल मिटकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते नागपूर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. तसेच, त्यांना कामधंदा उरलेला नाही. एकीकडे अजित पवार भाजपाबरोबर जाणं रोहित पवारांना चालत नाही. पण, अजित पवारांनी दिलेला निधी रोहित पवारांना चालतो. कर्जत-जामखेडला ५४ कोटींचा निधी मिळाल्याबद्दल रोहित पवारांनी अजित पवारांचे आभार मानल्याचं पत्र मी ट्वीट केलं होतं,” असं अमोल मिटकरांनी म्हटलं आहे.
“रोहित पवारांच्या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन नाही”
रोहित पवारांच्या ‘संघर्ष यात्रे’चाही अमोल मिटकरींनी समाचार घेतला आहे. अमोल मिटकरी म्हणाले, “रोहित पवारांनी कुठला संघर्ष केला आहे? कशासाठी यात्रा काढत आहेत? रोहित पवारांच्या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन नाही. अन्यथा यात्रेत राष्ट्रवादीचे झेंडे दिसले असते.”
“संघर्ष यात्रेला कवडीची किंमत नाही”
“प्रसिद्धीपलीकडे यात्रेत काही असेल, असं मला वाटत नाही. रोहित पवारांना आयुष्यात कधीही संघर्ष करण्याची वेळ आल्याचं वाटत नाही. बालमित्र घेऊन यात्रा निघाली नाही. त्यामुळे यात्रेला कवडीचीही किंमत नाही,” अशी टीका अमोल मिटकरांनी ‘संघर्ष यात्रे’वर केली आहे.