scorecardresearch

अनिल देशमुखांच्या जामिनावरून आमदार अमोल मिटकरींची भाजपावर टीका; म्हणाले, “हे प्रकरण जाणीवपूर्वक…”

अनिल देशमुखांना मिळालेल्या जामिनानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.

अनिल देशमुखांच्या जामिनावरून आमदार अमोल मिटकरींची भाजपावर टीका; म्हणाले, “हे प्रकरण जाणीवपूर्वक…”
अमोल मिटकरी (संग्रहित फोटो)

कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. देशमुखांना मिळालेल्या जामिनानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या जामीनावरही भाष्य केले.

हेही वाचा – अनिल देशमुखांच्या जामिनावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या ११ महिन्यांपासून…”

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“अनिल देशमुख यांना गेल्या ११ महिन्यांत शारीरिक व मानसिक त्रास झाला असेल. मात्र, उशीरा का होईना अनिल देशमुख यांना न्याय मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या ११ महिन्यांच्या तपासांत काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आज त्यांना जामीन मिळाला आहे, लवकरच ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतील”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही आरोप केले. “न्यायव्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही प्रकरणं भाजपाने जाणीवपूर्वक घडवून आणलेलं कटकारस्थान होतं. त्यामुळे आता केवळ एक जामीन मिळाला आहे, येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”

दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मिळाला असला, तरी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत जामीन मिळूनही देशमुख यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या