मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र दिलं जावं किंवा मराठा समाजाला थेट आरक्षण द्यावं, अशा दोन पर्यायांची राज्य सरकारकडून चाचपणी सुरू आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने मांडलेल्या भूमिकेवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आरक्षणावरून मांडलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण होऊ शकतो. अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, अकोला जिल्ह्यात आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजातील काही आंदोलक मला भेटायला आले होते. त्यांची भूमिका आहे की मराठा समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र मिळालं पाहिजे. आंदोलनात बहुसंख्य कुणबी बांधवही होते. परंतु, कुणबी बांधवांची भूमिका असली पाहिजे की मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्यायला आमची हरकत नाही. जेणेकरून आरक्षणाचा तिढा सोडवताना जास्त अडचणी येणार नाहीत.

अमोल मिटकरी म्हणाले, ज्याप्रमाणे सकल मराठा समाजाच्या भावना सगळे आमदार समजून घेत आहेत. तसेच सकल मराठा समाजाबरोबर जे कुणबी येत आहेत त्यांनीसुद्धा मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाबद्दल भूमिका जाहीर करावी. ओबीसींमधल्या कुणबी समाजाने मन मोठं करावं. कुणबी समाजातून मराठ्यांना सरसकट जातप्रमाणपत्र द्यायला आमची हरकत नाही, मराठ्यांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाही अशी भूमिका ओबीसींमधल्या कुणबी समुदायाने घ्यावी. अशीच विनंती मी कुणबी प्रतिनिधिंना केली आहे आणि त्यांनी त्यास होकार दर्शवला आहे.

हे ही वाचा >> “…तर ही मोठी हराXXखोरी आहे”, मराठा समाजाच्या कुणबी जात प्रमाणपत्रावरून बच्चू कडू आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेचं एकदिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी

आमदार मिटकरी म्हणाले, अकोला सकल मराठा समाजातील कुणबी बांधवांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास होकार दर्शवला आहे. त्यांचं निवेदन मी स्वीकारलं आहे. त्याचबरोबर आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने एकदिवसीय अधिवेशन बोलवावं, अशी आमची मागणी आहे. त्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडू. अधिवेशन बोलावण्यास आम्ही आग्रही आहोत.