माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या चित्रपटाला विरोध केला आहे. काल ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने या चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चित्रटाचा शो पुन्हा सुरू केला. यावरून आता राष्ट्रावादी-मनसे असा संघर्ष सुरू असताना आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट करत मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – ‘हर हर महादेव’ वादावर गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना…”

काय म्हणाले अमोल मिटकरी?

”राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले, अशी चर्चा आहे. कदाचित त्यामुळेच काही लोकांचा इतका तांडव सुरू नसेल ना? राज ठाकरेंनी याचा खुलासा करावा. आपण शिवप्रेमी आहात म्हणून विचारतोय”, असे खोचक ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

हर हर महादेव या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी झालेल्या वादातून एक प्रेक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.