गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आधी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा, शिवसेना कार्यकर्त्यांचं आंदोलन, राणा दाम्पत्याची माघार आणि अटक या गोष्टी चर्चेत राहिल्या. त्यानंतर शनिवारी रात्री उशीरा किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेली दगडफेक राजकीय वादासाठी कारणीभूत ठरली. या मुद्द्यांवरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला आहे. यासाठी त्यांनी सलमान खानच्या एका चित्रपटातल्या गाण्याच्या ओळी बदल करून लिहिल्या आहेत!

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्या शनिवारी मुंबईत देखील हजर होत्या. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मातोश्री आणि राणा यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिल्यामुळे राणा दाम्पत्याला घराबाहेर पडता आलं नाही. अखेर दुपारी त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं. मात्र, सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.

अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी रात्री उशीरा भाजपा नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. मात्र, तिथून परत निघताना त्यांच्या गाडीवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये गाडीची एक काच फुटली. तसेच, किरीट सोमय्यांना किरकोळ जखम देखील झाली. मात्र, हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाने पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी करवला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. भाजपानं देखील या दोन मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली आहे.

“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!”

या पार्श्वभूमीवर आता अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्वीट देखील चर्चेत आलं आहे. “बाळासाहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करूं तो साला, कॅरेक्टर ढीला है”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

ट्वीटचा नेमका अर्थ काय?

वास्तविक अमृता फडणवीस यांनी शनिवारी रात्री केलेलं एक ट्वीट करून पुन्हा डिलीट केलं. त्यावरून ट्विटरवर मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावर त्यांनी हे ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.

ट्वीट केलं आणि डिलीटही केलं!

अमृता फडणवीस यांनी शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास एक ट्वीट केलं होतं. यामध्ये “उध्वस्त ठरकीने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?” असा खोचक सवाल केला होता. त्याखाली #Maharashtraunderattack असा हॅशटॅग देखील त्यांनी दिला होता. मात्र, यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट करत दुसरं ट्वीट केलं.

“कभी लिख देते है, कभी मिटा देते है हम..पर सच का आईना, बेखौफ दिखा देते है हम!” असं नंतर केलेल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्वीट देखील व्हायरल होऊ लागलं आहे!