जळगाव : एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ख्याती असलेल्या तापी काठावरील रावेर लोकसभा मतदारसंघ १९८९ नंतर भाजपचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला. १९९८ च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता येथे भाजपचाच झेंडा फडकला आहे. गेल्या पंचवार्षिकला माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या विक्रमी चार लाख मतांनी निवडून आल्या. भाजपतर्फे त्यांनाच उमेदवारी मिळणे निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने कोण उमेदवार मैदानात उतरेल, याबाबत अनिश्चितता कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार असताना मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील पंचवार्षिक निवडणूक अनेक कारणांनी गाजली होती. भाजपचे तत्कालीन खासदार हरिभाऊ  जावळे यांचे ऐन वेळी तिकीट कापून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली होती. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या चर्चेत असलेल्या उमेदवारांना डावलून काँग्रेसचे तत्कालीन विधान परिषद सदस्य मनीष जैन यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविली होती. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या सर्व उलथापालथीमुळे मतदारसंघात गटातटाचे राजकारण झाले. एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि मोदी लाट यामुळे २०१४ च्या निवडणुकीत रक्षा खडसे तब्बल सहा लाख, पाच हजार ४५२ मते मिळवीत निवडून आल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांना अवघी दोन लाख, ८७ हजार ३८४ मते मिळाली. डॉ. उल्हास पाटील यांना २१ हजार, ३३२ मते मिळाली. यंदा हा गोंधळ नसला तरी भाजपमध्ये खडसे आणि महाजन असे दोन गट उघडपणे पडले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याने ते भाजप, विशेषत: खडसेंना किती मदत करतात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

आघाडीच्या जागावाटपानुसार जिल्ह्य़ातील रावेर आणि जळगाव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. दोन पंचवार्षिक ही जागा राष्ट्रवादीने लढविली आहे. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे काँग्रेसने फैजपूर येथे झालेल्या संघर्ष यात्रेदरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघावर दावा केला. यास काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही पाठिंबा देत राष्ट्रवादीकडून ही जागा ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले. तेव्हापासून डॉ. उल्हास पाटील हे जोरदार तयारीला लागले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांना रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या मतदारसंघावर रक्षा खडसे यांची पकड आहे. मध्यंतरी पक्षाच्या खासदारांच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे दाखले देत त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा होती. मात्र त्यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. हरिभाऊ जावळेंचे नाव चर्चेत असले तरी खडसेंना डावलून अन्य कोणालाही उमेदवारी मिळणे अशक्य आहे. कारण सध्या भाजपला एकेक जागा महत्त्वाची असल्याने स्थानिक पातळीवरील वादामुळे पक्ष जागा हातातून सुटू देणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. निवडणूक उंबरठय़ावर आली असताना नवखा उमेदवार देणे पक्षाला परवडणारे नाही. अन्य पक्षातील उमेदवार आयात करून त्याला निवडून आणण्याचा गिरीश महाजन पॅटर्न या मतदारसंघात यशस्वी होणार नाही, अशी भाजप नेत्यांमध्ये चर्चा आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात खडसेंच्या पसंतीच्या उमेदवाराला महत्त्व आहे. जर रक्षा खडसेंना उमेदवारीसाठी डावलण्यात आले, तर खडसे कोणती भूमिका घेतील, याविषयीही कुतूहल आहे. रक्षा खडसेंनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून पाच वर्षांत भाजपने दिलेल्या संधीमुळे मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली. याचा फायदा पक्षाला मिळेल, असा दावा केला आहे.

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत खडसे समर्थक तत्कालीन आमदार जगवानी यांना उमेदवारी नाकारली होती. हा प्रयोग रावेर मतदारसंघात करणे शक्य होणार नाही; परंतु राज्याच्या राजकारणात नकोसे झालेले एकनाथ खडसे यांनाच दिल्लीत पाठविण्याचा मध्यंतरी विचार सुरू झाला होता. राज्यसभेसाठी खडसे यांच्याकडे विचारणा झाली होती. पण दिल्लीत जाण्यास खडसे यांनी नकार दिला होता. खडसे यांच्या सुनेचा पत्ता कापल्यास भाजपला ते अडचणीचे ठरू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्रानुसार साडेचार वर्षांत रावेर लोकसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्यात आली. अगदी शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली असल्याने विरोधकांना पराभव समोर दिसत आहे. यामुळे ते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. भाजपमध्ये कोणतेही गट-तट नाहीत. पक्ष जो आदेश देतो, त्याची आम्ही केवळ अंमलबजावणी करतो. यंदाही पक्षाने संधी दिल्यास मागील निकालाची पुनरावृत्ती करून दाखवू.

– रक्षा खडसे, खासदार (भाजप)

हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने आम्ही निवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. पक्षाकडे अनेक तगडे उमेदवार असून सर्व इच्छुकांशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा केली आहे. लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल. मित्रपक्षही सोबत असल्याने यंदा विजय आमचाच आहे.

– अ‍ॅड. रवींद्र पाटील  (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of raver parliamentary constituency
First published on: 20-02-2019 at 03:42 IST