राजापूर : कोकणच्या शेकडो वर्षांच्या गणेशोत्सवाच्या परंपरेचा वारसा राजापूर तालुक्याला लाभला आहे. तालुक्यातील कोतापूर येथील श्रीदेव सिद्धिविनायक मंदिरामध्ये गुजरात येथून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या प्रवाळापासून बनवण्यात आलेली उजव्या सोंडेची वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती तब्बल सव्वादोनशे (शके १७८५) वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी प्रतिष्ठापित करण्यात आली आहे.
बडोदा संस्थानचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारी मुनीमजी असलेले गोपाळराव रामराव जांभेकर उर्फ महिराळ यांनी धोपेश्वर येथील हरी केशव पळसुलेदेसाई यांच्या सांगण्यावरून ही श्रीदेव गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. स्वप्नदृष्टांतानुसार, महिराळ यांनी प्रतिष्ठापित केलेल्या २१ गणेशमूर्तींपैक कोतापूरची एक गणेशमुर्ती असून अशाचप्रकारची हुबेहुब गणेशमुर्ती बडोदा येथे आजही असल्याची माहिती श्रीदेव सिद्धीविनायक मंदीराचे विश्वस्थ रविंद्र उर्फ विजय प्रभुघाटे यांनी दिली.
सुमारे सात गुंठे जागेमध्ये कौलारू छप्पर आणि लाकडी खांब असलेली मंदीराची ३५ बाय ७० फुट आकाराची आकर्षक इमारत आहे. जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदीराचा मुख्य गाभारा आणि समोर सभामंडप अशी रचना आहे. इमारतीच्या दर्शनी भागामध्ये जांभ्या दगडामध्ये कोरलेली आकर्षक दीपमाळही दिसते. श्रीदेव सिद्धीविनायकाची मुर्ती प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी ही इमारत साध्या पद्धतीची होती. त्यावेळी मंदीरामध्ये असलेले ‘त्रिविक्रम’(श्रीदेव गणपतीचा अंश) होते.
ते काढून त्या ठिकाणी महिराळ यांनी नर्मदा नदीच्या प्रवाळापासून बनविण्यात आलेली श्रीदेव सिद्धीविनायकची मुर्ती बाळाजी गोपाळ प्रभुघाटे यांच्या कारकीर्दीत हरि बल्लाळ प्रभुघाटे यांनी प्रतिष्ठापित केल्याची माहिती विश्वस्थ श्री. प्रभुघाटे यांनी दिली. सुमारे चार-साडेचार फुट उंचीची बैठ्या पद्धतीची उजव्या सोंडेची ही आकर्षक रंगाची गणेशमुर्ती आहे. मंदीरामध्ये संकष्टी चतुर्थी, अंगारकी यांसह श्रीसत्यविनायक पूजा, गणेशयाग आदी कार्यक्रमही होतात. तर, माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या कालावधीमध्ये माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात दरदिवशी पूजा, अथर्वशीर्ष आवर्तन, पालखी प्रदक्षिणा आणि आरती असे धार्मिक कार्यक्रम होतात. गणेशजयंती दिवशी गणेशजन्म सोहळा, श्री गणेशजन्म कथेवर आधारित कीर्तन होते.
गणेशोत्सव काळात सकाळी षोड्शोपचार पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर आरती आणि भजन असे कार्यक्रम उत्सवकाळात होणार आहेत.
नवसाला पावणारा श्रीदेव सिद्धिविनायक म्हणून कोतापूरच्या सिद्धिविनायकाची ख्याती आहे. विविध नवसांनाही पावत श्री सिद्धिविनायकाकडून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याची माहिती रवींद्र प्रभुघाटे यांनी दिली. मंदीरामध्ये श्रीदेव सिद्धीविनायकाची प्रतिष्ठापित मुर्ती ‘बाळगणेश’ या नावानेही प्रसिद्ध असून श्रीदेव सिद्धीविनायकाच्या दर्शनासह उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यासह कर्नाटक राज्यातीलही गणेशभक्त मोठ्यासंख्येने येतात.
श्रीदेव सिद्धीविनायक मंदीरामध्ये तीन गणेशमुर्त्या आहेत. त्यापैकी नर्मदा नदीच्या प्रवाळापासून बनविलेली गणेशमुर्ती मंदीरामध्ये प्रतिष्ठापित करण्यात आलेली असून दुसरी लाकडी गणेशमुर्ती उत्सवाच्यावेळी मंदीराभोवती घालण्यात येणार्या पालखी प्रदक्षिणेच्यावेळी पालखीमध्ये ठेवण्यात येते. तर, तिसरी चिनी मातीची छोटी गणेशमुर्ती असून ती गणेशजन्म सोहळ्याच्यावेळी पाळण्यामध्ये ठेवली जात असल्याची माहिती श्रीदेव सिद्धीविनायक मंदीराचे विश्वस्थ रविंद्र प्रभुघाटे यांनी दिली.
मंदिराचे महत्व..
– तब्बल सव्वादोनशे वर्षांपूर्वीची प्रतिष्ठापना
– उजव्या सोंडेची दुर्मीळ मूर्ती
– नवसाला पावणारा ‘बाळगणेश’ मूर्ती
– महाराष्ट्र-कर्नाटकातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी
– स्वप्नदृष्टांतातून मूर्तीची स्थापन