राज्यात येत्या दोन-तीन महिन्यांत विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. असे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार, असं विधान केलं. त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘महायुतीमध्ये एकोपा नाही आणि तुम्ही विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याचं स्वप्न पाहत आहात. मात्र, तुम्ही विधानसभेची स्वप्नं पाहू नका’, असा टोला अनिल देशमुख यांनी फडणवीसांना लगावला.

अनिल देशमुख काय म्हणाले?

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करून भारतीय संघाने जगज्जेतेपद पटकावलं. याची पार्श्वभूमी सांगत अनिल देशमुख म्हणाले, “देवेंद्र फडणवीस साहेब काल भारतीय संघ जिंकला. कारण विराट कोहली, जसमीत बुमराह, हार्दिक पांड्या यांच्यामध्ये एकोपा होता. सांघिक भावना होती. मात्र, तुमच्या महायुतीमध्ये ना सांघिक भावना आहे. ना एकोपा आहे. असं असतानाही तुम्ही विधानसभेची निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पाहत आहात. असे स्वप्न पाहू नका”, असा टोला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावेंचं मोठं विधान; म्हणाले, “शंभर टक्के…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला. त्यामुळे सर्व भारतीयांना अभिमान आहे. भारतीय संघ ज्या प्रकारे खेळला आहे. त्यामध्ये विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. त्यामुळे मी भारतीय संघाचं अभिनंदन करतो. सूर्यकुमार यादवचा कॅच हा गेमचेंजर ठरला. जसमीत बुमराह, हार्दिक पांड्याची बॉलिंग आणि विराट कोहलीची इनिंग, कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्त्वात संपूर्ण टीमने भारताला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेता बनवलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

यावेळी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमची मॅच टीम इंडियासारखीच असेल. विधानसभेची मॅच आमची महायुतीच जिंकेल. त्या दिशेने आम्ही आग्रेसर आहेत”, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.