महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना गृहमंत्रीपदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. तसेच १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांची १४ महिने तुरुंगवारीही झाली होती. १४ महिन्यांनी तुरुंगातून बाहेर पडलेले अनिल देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात आहे. शरद पवार गटाची सध्या कोल्हापुरात जाहीर सभा सुरू आहे. या सभेत बोलताना अनिल देशमुख यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे.

अनिल देसमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले आपले सहकारी आपल्याला सोडून भाजपाबरोबर गेले आणि त्यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. शरद पवारांच्या आशीर्वादाने मोठे झालेले हे लोक आता शरद पवारांना सोडून गेले आहेत. मुळात हे लोक का सोडून गेले? केवळ ईडीच्या धाकाने हे सगळे लोक पळून गेले. परंतु, ईडीची भीती तर मलाही होती. ईडीचा धाक मलाही दाखवला होता. मला म्हणाले, हमारे साथ समझोता कर लो (आमच्याशी तडजोड करा), परंतु, मी त्यांना म्हटलं आयुष्यभर तुरुंगात राहीन पण तुमच्याबरोबर सौदा करणार नाही.

अनिल देशमुख म्हणाले, त्या लोकांनी परमवीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप करायला लावले. मग हे प्रकरण न्यायालयात गेलं. परमवीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप केला होता. न्यायालयात खटला सुरू असताना न्यायमूर्ती म्हणाले, परमवीर सिंह यांना हजर करा. आम्हाला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. न्यायालयाने त्यांना एकापाठोपाठ एक असे सहा समन्स पाठवले, परंतु, परमवीर सिंह न्यायालयासमोर हजर झाले नाहीत.

हे ही वचा >> Chandrayan 3 : चांद्रमोहिमेच्या यशामागचे मराठमोळे हात, नांदेडच्या संशोधिकेचं ‘विक्रम’च्या लँडिंगमध्ये मोठं योगदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल देशमुख म्हणाले, अनेक महिन्यांनी परमवीर सिंह यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात त्यांनी म्हटलं, अनिल देशमुखांवर मी जे आरोप केले आहेत त्यात काही तथ्य नाही. त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. मी ऐकीव माहितीच्या आधारावर हे आरोप केले होते. परंतु, हे होता होता १४ महिने उलटले. १४ महिने मला तुरुंगात काढावे लागले. मी त्यांना सांगितलं होतं, मी शरद पवारांची साथ कधी सोडणार नाही. १४ महिन्यांनी मी बाहेर आल्यानंतर आज मी खंबीरपणे शरद पवार यांच्याबरोबर उभा आहे.