Anjali Damania Post on Dhananjay Munde: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणावरून सातत्याने पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये या हत्येचा आरोप असणारा वाल्मिक कराड व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी असणारे धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचं त्या मांडत आहेत. आपल्या दाव्याचं समर्थन करणारे काही कागदोपत्री तर काही व्हिडीओ व फोटोही पोस्टसोबत त्या शेअर करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची एका जमिनीवर सयुक्त मालकी असल्याची कागदपत्र शेअर केली होती. आता त्यांनी आणखी एक पोस्ट केली असून त्यात धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तुल असल्याचं दिसत आहे.

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणावर थेट विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला थेट मंत्री धनंजय मुंडे यांचं संरक्षण असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असाच दावा अंजली दमानिया यांनीही केला असून धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराडशी व्यावसायिक संबंध असल्याचा दावा करणारी पोस्ट त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.

जमिनीच्या सातबाऱ्यावर दोघांची नावं!

अंजली दमानिया यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत मोठा दावा करणारी काही कागदपत्र २३ डिसेंबर रोजी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केली आहेत. ही कागदपत्रे म्हणजे जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या सातबाऱ्यांमध्येही इतर काही नावांसोबत धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचीही नावं दिसत आहेत.

Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!

दरम्यान, अंजली दमानिया यांनी आता त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन इन्स्टाग्राम रील आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असलेला एक फोटो एका रीलमध्ये आहे. त्यामागे एक गाणंही लावण्यात आलं आहे. दुसऱ्या रीलमध्ये धनंजय मुंडे एक गाडीत बसल्याचं दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंजली दमानियांनी केली ‘ही’ मागणी!

“हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणं सोपं असंच त्यांना वाटतं. आपला देश असा असणार आहे का? देशाबद्दल हे व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले परवाने रद्द करा”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये केली आहे.