सातारा : शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शंभर वर्षांनंतरही तसूभर बदललेले नाही. रयत शिक्षण संस्था ही अशा प्रकारची महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. स्थापनेपासून आजही शिक्षण हाच ‘रयत’चा धर्म राहिला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध ग्रामीण कवी इंद्रजित भालेराव यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या १०६ व्या वर्धापनदिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी होते, यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कुलगुरू प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कर्मवीर कुटुंबीय, संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर, जे. के. जाधव, प्रभाकर देशमुख, सदाशिव कदम, भैयासाहेब जाधवराव, अरुण पवार, प्रशांत पाटील, यशवंत पाटणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भालेराव म्हणाले, रयत शिक्षण संस्था ही गुणवत्तेला प्राधान्य देणारी संस्था आहे. स्थापनेपासून आज अखेर मूळ उद्देशानुसार चालणारी ही संस्था होय. महाराष्ट्रातील पुरोगामी समाजसुधारकांची एकत्रित सत्त्वे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यात होती. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन शिक्षण संस्थेला ‘रयत’ हे नाव दिले. देशाच्या विकासासाठी दृष्टी देणारे नेतृत्व रयतकडे आहे. कर्मवीरांनी शिक्षणाला श्रमाची जोड दिली. कर्मवीर ही पदवी जनतेच्या मुखातून आलेली आहे. आज रयत शिक्षण संस्थेत जागतिक पातळीवरील उपक्रम सुरू आहेत. यावेळी त्यांनी विविध गाजलेल्या कविता सादर केल्या.

कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. उत्साहाने काम करणारे शिक्षक हीच रयतची ताकद आहे. रयतच्या सर्व शाखेत इंटरएक्टीव्ह पॅनल, कृत्रिम बुध्दिमत्ता प्रशिक्षण, ईआरपी स्वॉफ्टवेअर, संस्थेचे स्वतःचे डेटा सायन्स सेंटर इत्यादी नवीन धोरणाबद्दल माहिती दिली. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी रयत अकॅडमी सुरू करीत असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षिकेचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. कार्यक्रमास सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, ॲड. दिलावर मुल्ला इत्यादी उपस्थित होते. सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले.