सांगली : सोमवारी होणारी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. बँकेच्या सभासदांना ३ टक्के लाभांश देणारअसल्याची घोषणा अध्यक्ष संतोष जगताप व सत्ताधारी गटाचे नेते विनायक शिंदे यांनी केली असली तरी लाभांशातील रक्कम इमारतीसाठी वर्ग करून सत्ताधारी गटाने नुकसान केल्याचा आरोप बँक बचाव समितीचे यू. टी. जाधव, सचिव शशिकांत बजबळे आदींसह जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील यांनी केला आहे.

शिक्षक बँकेची वार्षिक सभा सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी बोलावण्यात आली असून, सत्ता मिळाल्यानंतर सत्ताधारी स्वाभिमानी पॅनेलने दिलेल्या शब्दानुसार बँकेचे नवीन अद्ययावत इमारतीमध्ये स्थलांतर केले असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. बँकेला गेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी ७२ लाख रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना ३ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, सभेत आपण सत्ताधारी गटाला वारेमाप उधळपट्टीबाबत विचारणा करणार असल्याचे सांगत इमारत पूर्ण झाली असतानाही विषय पत्रिकेवर १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद कशासाठी याची विचारणा करणार आहे. सभासदांच्या नफ्यावर हक्क असतानाही त्यात कपात करून तो निधी इमारतीसाठी का वर्ग करण्यात आला याचाही जाब विचारला जाईल, असे श्री. जाधव यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक बँकेत विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी आघाडीने सत्तापरिवर्तन करत कारभार हाती घेतला असून गेली चार वर्षे या बँकेच्या कारभाराबाबत विरोधकांकडून स्वाभिमानी गटाला लक्ष्य केले जात असून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने ताकद अजमावण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून होत असतो. यामुळे सोमवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. सुमारे सात हजार सभासद असलेल्या आणि पाचशे कोटींचा वार्षिक व्यवहार असलेल्या या बँकेची सर्वसाधारण सभा नेहमीच गाजत असते. सत्ताधारी गटाला नवीन इमारत बांधकाम, नोकरभरती, लाभांश, एक अंकी व्याज दर यावरून धारेवर धरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष बदल करून श्री. शिंदे यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.