कराड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांविरोधात सलग चार दिवस धडक कारवाईची मोहीम राबवली. त्यात पालिकेने शहरातील पदपथ व रस्त्यांकडेची अतिक्रमण काढल्याने या ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला असून, कराडकरांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील प्रमुख चौकात व मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. बऱ्याचदा वाहतूकही ठप्प होण्यास ही अतिक्रमणे कारणीभूत ठरत होती. याला त्रासलेल्या जनतेकडून तक्रारी होत होत्या. याची गांभीर्याने दखल घेवून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अतिक्रमण विरोधी धडक मोहीम’ राबवण्यात आली.
आरोग्य निरीक्षक देवानंद जगताप, मुकादम प्रमोद कांबळे, अशोक डाईंगडे, अभिजित खवळे, नाना सोनवणे, अतुल माने, प्रवीण शिंदे, सोनू चव्हाण व सर्व कर्मचारी यांनी ही अतिक्रमण विरोधी धडक मोहीम प्रभावीपणे राबवणे सुरू ठेवले आहे. या कारवाईत बसस्थानक परिसर, नवग्रह मंदिर परिसर, भेदा चौक, दत्त चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, उपजिल्हा रुग्णालय, कार्वे नाका, भेदा चौक परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.
या धडक मोहिमेत शहरातील मोठमोठे फलक (फ्लेक्स), रस्त्यावर अडथळा ठरणारी खोकी काढण्यात आली. पदपथावरील छोट्या व्यावसायिकांनाही हटवण्यात आले, तसेच टेबल खुर्च्या मांडून पदपथ अडवणाऱ्या चायनीज गाडेधारकांची उचलबांगडी झाल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या धडक कारवाईने पदपथ व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
कराड पालिकेचे या धडक मोहिमेचे स्वागत होत असलेतरी पुन्हा अतिक्रमणे लागू नये, अतिक्रमणाचा विळखा पडू नये याची दक्षता घेताना, ही अतिक्रमण विरहित परिस्थिती कायम राखण्याचे पालिकेसमोर आव्हान राहणार आहे.