नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मागील ऑगस्टपासून एक वर्षाच्या आत दोन ज्येष्ठ संचालकांचा आजारपणाने मृत्यू झाला. नुकतेच दिवंगत झालेले बँकेचे उपाध्यक्ष हरिहर भोसीकर यांना शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान त्यांची रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शतकीय परंपरा असलेल्या जिल्हा बँकेत विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळास अलीकडे ४ वर्षे पूर्ण झाली. ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे सध्या बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याआधी वसंतराव चव्हाण यांनी अध्यक्षपद भूषविले होते. ते गतवर्षी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे गंभीर आजारपणात निधन झाल्यामुळे बँकेतील त्यांचे संचालकपद रिक्त झाले होते.

नंतर काही महिन्यांनी वसंत चव्हाण यांच्या रिक्त जागेवर त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळातील आणखी एक पद तसेच उपाध्यक्षपदही रिक्त झाले आहे. बँकेच्या इतिहासात संचालक मंडळाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात २ संचालकांचे निधन होण्याची घटना प्रथमच बघायला मिळाली.

हरिहर भोसीकर मागील चार वर्षांपासून बँकेचे उपाध्यक्ष होते. तत्पूर्वी ते इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) मतदारसंघातून संचालक मंडळावर निवडून आले होते. २७ मे रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर बँकेमध्ये दुखवटा पाळण्यात आला. काल म्हणजे शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेची सुरुवात त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.

भोसीकर यांचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांच्या परिवाराला प्राप्त झाले असून त्याची प्रत बँक प्रशासनाला शुक्रवारीच मिळाल्यामुळे बँकेच्या संचालक मंडळातील एक जागा रिक्त झाल्याची बाब सहकार खात्याच्या विभागीय सह निबंधकांना येत्या सोमवारी कळविणे बँक प्रशासनासाठी सुलभ झाले आहे. त्याबाबतचा औपचारिक ठराव शनिवारी करण्यात आला.

खतगावकर बँकेचे अध्यक्ष होण्याआधी वसंत चव्हाण यांनी अध्यक्षपदास अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर या पदाचा राजीनामा नेतृत्वाच्या आदेशान्वये दिला होता. पण भोसीकर यांना तेव्हा राजीनामा देण्यास सांगण्यात आले नव्हते. आता त्यांच्या निधनानंतर उपाध्यक्षपद रिक्त झाल्याने पुढील नऊ/दहा महिन्यांसाठी या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संबंधितांचे लक्ष आहे. तूर्त माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर हे उपाध्यक्षपदाचे दावेदार मानले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे बँकेमध्ये संचालक मंडळाची खतगावकर-चिखलीकर गट आणि खा.अशोक चव्हाण गट अशी विभागणी झाली आहे. खतगावकर-चिखलीकर गटाने उमेदपणा दाखविला तर बेटमोगरेकर हे उपाध्यक्ष होेऊ शकतात. मागे त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले होते, पण चव्हाण यांनी शेवटच्या क्षणी खतगावकरांचे नाव नक्की केल्यामुळे बेटमोगरेकरांची निराशा झाली होती.