scorecardresearch

मोठी बातमी! औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे.

मोठी बातमी! औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. यानंतर हा ठराव मंजूर झाला आहे. याशिवाय नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्यालाही मंजुरी मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभागृहात उपस्थित होते.

या ठरावांनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “आज छत्रपती संभाजीनगर, दि. बा. पाटील विमानतळाच्या नावाचे ठराव झाले. त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचाही ठराव झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारने या ठरावांसोबत त्याचाही पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ते नावही देण्यात यावं.”

आदित्य ठाकरेंच्या या मागणीनंतर याचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, असं उत्तर फडणवीसांनी दिलं.

दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध झालेले दिसले. कुणी आक्रमक टीका केली, तर कुणी खोचक टोले लगावत प्रत्युत्तर दिलं.

“तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि…”

एकनाथ शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला आहे. मी कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझा तो स्वभाव नाही. आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. आम्ही श्रद्धा आणि सबुरीनेच वागतो आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकेरेंचे आशीर्वाद आहेत आणि आनंद दिघेंवर आमची श्रद्धा आहे.”

“अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात”

“तुमचं वागणं, वेळापत्रक याविषयी आम्ही सगळीकडे बोलत असतो. अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात. तुम्ही मला एकदा पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावलं. आता आठ वाजता मी कसा येणार? मी झोपतोच पहाटे चार वाजता. तुमच्याबद्दल मला आदरही आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “आम्ही श्रद्ध सबुरीनेच काम करतो आहे. तुम्ही त्यावेळी थोडी घाई केली. तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंत पाटील यावर हसत आहेत. मला आठवतंय, जयंत पाटील म्हणाले म्हणाले होती की, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यामुळे अजित पवारांनी थोडी घाई केली.”

पाहा व्हिडीओ –

“…तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला”

“पहाटेचा शपथविधी सुरू होता तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि टीव्ही बघत आहे का विचारलं. मी टीव्ही पाहत होतो आणि अजित पवार शपथ घेत होते. मी म्हटलं हे मागचं कधीचं दाखवत आहेत की काय? त्यावर ते म्हणाले नाही, हे आताचंच आहे. तिथं देवेंद्र फडणवीस देखील दिसले. आमचे प्रमुख म्हटले मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. मी त्यांना म्हटलं जयंत पाटीलही तेथेच आहेत,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“मला वाटलं जयंत पाटील देखील तेथे आहेत, मात्र…”

“अनिल पाटील तेथे पाठमोरे होते. मला वाटलं जयंत पाटील देखील तेथे आहेत. मात्र, जयंत पाटील तेथे नव्हते. ते असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. ओके झाला असता,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या