महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या संभाजी भिडेंनी आता महात्मा फुलेंचाही अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना अटक केली गेली पाहिजे अशी मागणी आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?

संभाजी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे, त्याशिवाय हे सरळ होणार नाहीत. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही आहे की बहुजन समाजाचेच काही लोक मनोहर भिडेच्या मागे संभाजी भिडे असं करत फिरत आहेत.छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे दुर्दैवी आहे. राज्यात आणि देशात अशा प्रकारे वातावरण गढूळ करणारं हे जे प्रकरण आहे हे थांबलं पाहिजे आणि कुणीही त्यांना पाठिशी घालता कामा नये. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- अकोला : संभाजी भिडेंच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या; वंचित आक्रमक होत…

समाजसुधारकांविषयी हे कसं बोलू शकतात?

महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडेंनी गलिच्छ वक्तव्य केलं. त्यापुढे महात्मा ज्योतीराव फुले, लोकहितवादी या समाज सुधारकांना भ** ची यादी आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. मला एक कळत नाही त्यांचा बोलविता धनी कोण आहे? इतिहास बदलता येतो का? तुम्ही जे बोलताय ते रुजवता येतंय का असा एकंदरीत प्रयत्न सुरु असलेला दिसतो आहे. महात्मा फुले परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आम्ही संभाजी भिडेंच निषेध करतो आहोत असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना गरीब बांधवांनी आणि भगिनींनी लक्षात ठेवलं आहे. संभाजी भिडेंना शासनाने अटक केली आहे. पंतप्रधान उद्या पुण्यात येणार आहेत त्यांनाही ही बाब सांगितली पाहिजे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा आहे. त्यात हे असे लोक जाणीवपूर्वक अशा गोष्टी करत आहेत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- “आपली औकात…”, संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडू संतापले; म्हणाले, “नांग्या ठेचल्या पाहिजेत!”

नेमकं काय आहे हे प्रकरण?

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्याविरोधात निषेध नोंदवला जातो आहे. आंदोलनं केली जात आहेत. अधिवेशनातही त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. तसंच त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरातही उमटले. विविध ठिकाणी आजही आंदोलनं होत आहेत. तरीही संभाजी भिडे हे त्यांच्या वक्तव्यांवर ठाम आहेत.