आमदार यशोमती ठाकूर व चारुलता टोकस या विदर्भातील दोन महिला नेत्यांकडे काँग्रेस पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
महाराष्ट्र महिला काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या श्रीमती चारुलता टोकस या गांधी परिवाराच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जातात, तर राहुल ब्रिगेडच्या नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांची तर थेट अ.भा. संघटनेत सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या व लगतचे राज्य म्हणून कर्नाटकमधील प्रचाराची संभाव्य जबाबदारी अपेक्षित असणाऱ्या चारुलताताईंनी छत्तीसगढ, गुजरात, मध्य प्रदेशात महिला काँग्रेसबांधणीचे काम केले आहे. आई दिवंगत राज्यपाल प्रभाताई राव तसेच मावसभाऊ आमदार रणजित कांबळे यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा नेहमी त्यांनीच सांभाळली. दुसरीकडे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वावर राष्ट्रीय मोहोर उमटली आहे. मेघालयाच्या निवडणुकीत त्या पक्ष प्रभारी होत्या. राष्ट्रीय सचिवाची नियुक्ती व पाठोपाठ कर्नाटकच्या सहप्रभारी म्हणून नियुक्ती झालीआहे. श्रीमती चारुलता व यशोमती यांच्याखेरीज अ.भा. पातळीवर महाराष्ट्रातून मुंबईच्या जेनेट डिसूझा व नगमा यांना संघटनेत स्थान आहे. यापैकी डिसूझा यांनाही कर्नाटकच्या निवडणुकीत स्थान मिळालेले आहे.
पक्षाच्या कामाला मी कधीच नकार देत नाही. कोणतीही जबाबदारी मी स्वीकारते. मेघालयात मुक्कामी राहून मी प्रचारसूत्रे हाताळली होती. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर असा भेदभाव मी मानत नाही. – यशोमती ठाकूर, आमदार
विदर्भातीलच नव्हे तर एकूणच पक्षकार्यात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढत आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांवर जबाबदारी सोपविण्यास प्राधान्य दिले आहे. – चारुलता टोकस, कॉंग्रेस नेत्या