भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला विदर्भात खूप मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. दरम्यान आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांची काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात आहे. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती.

भाजपा आमदार आशिष देशमुख यांची अखेर भाजपाला सोडचिठ्ठी

आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. बऱ्याच काळापासून ते भाजपामध्ये नाराज होते. अनेकदा त्यांनी उघडपणे भाजपाच्या धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे ते लवकरच भाजपामधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मंगळवारी अखेर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला.

आशिष देशमुख यांना आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यापूर्वी त्यांच्या काटोल मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे शरद पवार यांचे राजकीय विरोधक होते. तर राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाही.

आशिष देशमुख काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून आमदारकी मिळवली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deshmukh submits resignation to assembly speaker
First published on: 03-10-2018 at 13:39 IST