काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने कॉल करून १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के.जी. एन. लाला याला अटक केली. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे. तसेच मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते आता तरी निषेध करणार का? असा प्रश्नही शेलार यांनी शिवसेनेचं ( ठाकरे गट ) नाव न घेता विचारला आहे.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

“१९९३ मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होईल आणि त्यानंतर जातीय दंगली होतील, असा कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के.जी. एन. लाला याला अटक केली आहे. तसेच १९९३च्या बॉम्बस्फोटातील काही आरोपी लालाच्या परिचयाचे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अशा घातक समाजकंटकांना बळ कसे मिळते?” असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.

राजकारणाचे घातक पट कोण रचतंय?

“नवाब मलिक-दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण दिले. याकूबची कबर सजवली. मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते याचा तरी निषेध करणार का? राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतंय? अशी टीका त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर केली आहे. तसेच आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवली असून आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय, असेही ते म्हणाले.

अंबादास दानवेंच शेलारांना प्रत्युत्तर

दरम्यान, शेलारांच्या या टीकेला उद्धव ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “याकूबची कबर कोणी सजवली हे सर्वांना माहिती आहे. ज्या ठिकाणी त्याची कबर आहे, तिथे भाजपाचे नगरसेवक आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा काढायची गरज नाही”, असे ते म्हणाले.