दावोस येथे १६ जानेवारी पासून आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेला देशातील सर्वच राज्यांचे प्रमुख गुंतवणूक आणण्यासाठी जात आहेत. १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दावोसचा दौरा अर्ध्यात सोडून येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन शिंदे – फडणवीस हे राज्यात गुंतवणूक आणण्याबाबत गंभीर नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना केली. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार म्हणाले, “मला असं वाटतं, ज्यांच्या अभ्यास कच्चा आहे आणि ज्यांकडे घरात पाटी असती तर बरं झालं असतं. रोज अबकड काढता आलं असतं, तर थोडं ज्ञानही मिळालं असतं. अशा संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखव’ याच्या पलिकडे काही नाही.”
याचबरोबर, “दावोसमध्येही जाऊन मंत्री महाराष्ट्राच्या हिताचे करार करणार आहेत, ते जातील करार करून आल्यावर संजय राऊत तोंडावर पडतील. आपण त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारा. मुंबईकरांची सेवा करणे ही सुद्धा प्राथमिकता आहे. दोन्ही बाजूचं काम हे सरकार करतंय. त्यामुळे आता हाताला काम राहीलं नाही तर तोंडाची पट्टी चालवणे यापेक्षा संजय राऊत काही करत नाहीत.” असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली.
संजय राऊत काय म्हणाले होते? –
“गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाहीत. देशातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी जात आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री देखील तिथे जाणार आहेत. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबईच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांचा दौरा आवश्यक वाटतो. पंतप्रधान राज्यात येतायत त्यांचे स्वागत केलेच पाहीजे. आपले पंतप्रधान चांगले आहेत. त्यांना जर विनंती केली असती तर प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यासाठी वेगळी तारीख दिली असती. प्रधानमंत्र्यांची वेगळी तारीख मिळू शकते, पण दावोसची दुसरी तारीख मिळणार नाही. महाराष्ट्राच्या प्रमुखांना गुंतवणुकीत रस दिसत नाही.” आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.
१९ जानेवारी रोजी पंतप्रधान मुंबईत –
शिंदे-फडणवीस सरकारच्या मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पातंर्गत मुंबईत ठिकठिकाणी अनेक विकासात्मक कामे सुरू आहेत. या विकासात्मक कामांचे येत्या १९ जानेवारी रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व मेट्रो 2 A आणि 7 मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. अशी माहितीही यावेळी आशिष शेलार यांनी दिली.
