शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षांची बिहारमधल्या पाटण्यात बैठक पार पाडली. या बैठकीला उद्धव ठाकरे गेले होते. या बैठकीबाबत बोलताना “परिवारवाद्यांची बैठक पाटण्यात झाली”, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला होता. फडणवीस म्हणाले होते की, देशातल्या सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्र आल्या आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कशी राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत, म्हणूनच ते लोक एकत्र आले आहेत. यांच्यासाठी राज्य चालवणं हा एक धंदा आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले, मी पाटण्याला गेलो, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात हे कुटुंब वाचवायला गेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये. कुटुंब फडणवीसांनाही आहे. त्यांच्या कुटुंबातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही अद्याप त्यावर बोललेलो नाही. जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल. त्यांना वेगळी कोणतीही आसनं झेपणार नाहीत. केवळ शवासन, फक्त पडून रहावं लागेल.

उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आता यावर भाजपानेही पलटवार केला आहे. भाजपा नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार याबाबत म्हणाले, उद्धवजी तुम्ही परिवारावर आलात तर तुम्हाला अंगावर आणि शिंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. परिवाराची भाषा आम्हाला शिकवू नका. थोडा आरसा घ्या, मातोश्रीच्या बंगला क्रमांक एक आणि दोनमध्ये जाऊन बघा. कोणाच्या परिवारावर सर्वात आधी २०१३ ला तुम्ही गेला होतात. कोणाचा बाप आणि पत्नी काढली होती. तुम्ही स्वतःच्या कुकृत्यांचे भोग भोगताय.

हे ही वाचा >> पंकजा मुंडे बीआरएस पक्षात जाणार? अंबादास दानवे म्हणाले, “आज ना उद्या त्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष शेलार म्हणाले, हा परिवारवादाचा विषय नसून, हा मुंबईकरांच्या पैशांवर टाकलेला डल्ला आहे. मुंबईकर परिवाराच्या खिशावरील डल्ला आहे, त्याचा आधी हिशेब द्या.