कराड : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली आणि संजय राऊत हे त्याचे मूळ आहेत. तरी उद्धव ठाकरेंना ‘बेईमान ऑफ द महाराष्ट्र’ हा किताब द्यावा लागेल, अशी जोरदार टीका भाजप नेते, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. स्वार्थासाठी हजारो झाडांची कत्तल करणाऱ्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याच्या शब्दांत शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना फटकारले.
कराडमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. शेलार म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री असताना मुंबईतील सर्वात जास्त झाडांचा खून केला. या वृक्षतोडीचा महापालिकेतील विकासकाला जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी प्रत्येक वर्षी ६ ते ७ हजार झाडांची कत्तल केली. अशांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे कोरडे शेलार यांनी ओढले.
भाजप भविष्याच्या दृष्टीने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याने पक्षाची व्याप्ती वाढत असून भाजप मजबूत तरच, महायुती मजबूत होणार असून ‘सबका साथ, सबका विकास’ हीच भाजपची भूमिका राहिली असल्याचे शेलार यांनी सांगितले. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मी निधी देत नाही, अशी टीका करणाऱ्यांना मी पैसे खिशात घेऊन फिरतो काय’? असा सवाल केला असल्याबाबत विचारले असता, मी त्याबाबत काही ऐकले नसल्याचे सांगत आशिष शेलार यांनी या प्रश्नाला बगल दिली.