काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती माझ्यावर पाळत ठेवत असून हे माझा घातपात घडवण्याचं कारस्थान असू शकतं, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या प्रकारानंतर चव्हाण यांनी नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली.

मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडवण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

अशोक चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून मूळ मजकूर बदलला आहे. त्यांनी बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहेत. याची कुणकुण आपल्याला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे.

यानंतर, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटं पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली. ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे. त्याअर्थी पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता दिसून येते. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढेच नव्हे तर मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येत आहे. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचं कारस्थान असावं, असाही गंभीर संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.