सांगली : सांगलीतील शिवाजी क्रीडांगणावर जखमी अवस्थेत उदमांजर सापडले. प्राणी मित्रांनी त्याला पकडून मंगळवारी सकाळी वन विभागाच्या ताब्यात दिले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार करून पुण्यातील कात्रज उद्यानात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उदमांजर हा सस्तन प्राणी असून त्याला स्थानिक पातळीवर इजाट, मंजाट या नावानेही ओळखले जाते.

सांगलीच्या शिवाजी स्टेडियमवर काहींनी या इजाटला पाहिले. मागील दोन्ही पायाला दुखापत झालेल्या अवस्थेत तो आढळून आला. इन्साफ फाउंडेशनचे प्रमुख प्राणी मित्र मुस्तफा मुजावर यांना याची माहिती मिळाल्यानंतर ते त्यांचे सहकारी प्राणी मित्र गणेश पाटील यांच्यासह सर्व सामग्री घेऊन तेथे दाखल झाले. सुरक्षितपणे इजाटला पकडून पुढील उपचारासाठी मंदार िशपी व सुनील कपाले यांच्यासोबत जाऊन वनविभागाच्या ताब्यात दिले. त्याला पकडण्यापासून उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यापर्यंत पापा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

इजाटला (इंडियन स्मॉल सिव्हेट) उदमांजर म्हणूनही ओळखले जाते. हा सस्तन व मांसाहारी प्राणी असून उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, कीटक हे त्याचे खाद्य आहे. निशाचर असणाऱ्या काळपट तपकिरी रंगाच्या उदमांजराच्या अंगावर लहान काळ्या ठिपक्यांच्या रेषा असतात. यांची शेपटी काळपट रंगाची असून झुपकेदार असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांची लांबी ४२ ते ६९ सेंमीच्या दरम्यान असून वजन ३ ते ४ किलो असते. यांचे अस्तित्व हे जंगलात तर असतेच शिवाय मानवी वस्तीजवळही ते आढळतात.