बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.

बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाच बाहेर येता आलं नाही

बस आधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आलं नाही. वाचलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले अशीही माहिती मिळते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडले आहे. बसने पेट घेतल्याने मृतदेह होरपळले आहेत. त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे अशीही माहिती समोर आली आहे.