हिंगोली : औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील सुमारे ५५ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ पंचायत समितीमधील गैरव्यवहाराचे प्रकरण गेल्या वर्षभरापासून चांगलेच गाजत आहे. सेनगाव येथे कपातीच्या रकमांमध्ये सुमारे ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी तत्कालीन चौघांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षांतील कपातीच्या रकमांची चौकशी करण्यासाठी लेखा विभागाचे पथक गेले होते.
मात्र, पथक कार्यालयात पोहोचण्यादरम्यान दुसऱ्याच दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व संगणक जळाले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नसल्याचे चौकशीअंती समोर आले आहे. त्यानंतर मात्र पोलिसांचा तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. याप्रकरणी कपातीचे धनादेश वैयक्तिक नावे उचलून घेण्यात आले असून, त्यातून ५५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल या पथकाने दिला आहे.
या अहवालानंतर लेखा विभागाने चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून खुलासाही घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या खुलाशावर आमची स्वाक्षरी नाही, आमचे हस्ताक्षर नसल्याचे नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचे खुलासे मान्य करून त्यांना अभय देण्याची तयारीही लेखा विभागाने सुरू केली आहे.
रकमेतून वैयक्तिक कर्जाची हप्तेफेड
याप्रकरणी लेखा विभागाच्या पथकाने १ एप्रिल २३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील लेखापरीक्षण केले. यामध्ये जीएसटी कपातीसह इतर कपातीच्या रकमा वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आल्याचे तपासातून उघडकीस आले. एका कर्मचाऱ्याने त्याच्या नावे असलेले सेनगाव तालुक्यातील एका संस्थेचे १३ लाख रुपयांचे कर्ज यातूनच फेडल्याचे समोर आले होते.