Bajrang Sonavane : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.

व्हिडीओत काय म्हटलं आहे वाल्मिक कराड यांनी?

व्हिडीओत ते म्हणाले, “मी वाल्मिक कराड. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”

बजरंग सोनावणे काय म्हणाले?

वाल्मिक कराड शरण आले हे मला माध्यमांमुळेच कळलं आहे. मात्र पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांना अटक कुठल्या कारणाने झाली आहे? ते कळलं पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांनी काय मागणी करायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे असंही सोनावणे म्हणाले. २० दिवस उलटूनही वाल्मिक कराड आज सरेंडर व्हायला आला आहे.

हे पण वाचा- ‘अफझल गुरू, कसाबनेही स्वतःचा गुन्हा कबूल केला नव्हता’, वाल्मिक कराडच्या शरणागतीवर सुरशे धस यांची मोठी प्रतिक्रिया

राजकीय द्वेष आणि दोष कुणाचा?

राजकीय दोष कुणाचा? राजकीय दोष कोण देतं आहे वाल्मिक कराड यांना? भाजपा, अजित पवार गटाचे तीन आमदार यांनी सगळ्यानीच वाल्मिक कराडचं नाव घेतलं आहे. महायुतीचे नेतेही मागणी करत आहेत. मग त्यांचा द्वेष आहे का? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तपास यंत्रणांकडून एकच अपेक्षा आहे की या वाल्मिक कराडचे संबंध कुणाशी आहे ते तपासावं. त्यांनी पारदर्शकपणे तपास करावा. तपासातून दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे त्याला शोधलं पाहिजे ही संतोष देशमुख यांच्या मुलीची मागणी आहे. त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असंही बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता बजरंग सोनावणेंनी या प्रकरणात सीआयडीने पारदर्शकपणे तपास केला पाहिजे असं म्हटलं आहे.

Story img Loader