सांगली : महाराष्ट्रासह कर्नाटक आणि छत्तीसगडमधील वाहनांचे तपासणी नाके बंद करण्यात यावेत, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असे ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.




हेही वाचा – “अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड…”, गोपीचंद पडळकर यांची टीका
देशातील केवळ १३ राज्ये वगळता अन्य राज्यांनी तपासणी नाके बंद केले आहेत. याबाबत मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठकही झाली आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. सध्या आपण डिजिटल युगात वावरत असून ई-वे बिल असताना वाहन सुस्थितीत असल्याविना वाहतूक अशक्य आहे. असे असताना तपासणीच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनेही पावले उचलण्याची गरज आहे. डिजिटल युगात आभासी चलनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. असे असताना वाहतुकीमध्ये वेळ जातो. प्रगत राष्ट्रामध्ये एका दिवसात ९०० किलोमीटर वाहतूक होते, मात्र, आपल्या ठिकाणी केवळ अडीचशे किलोमीटर वाहतूक होते. महाराष्ट्रासह कर्नाटक व छत्तीसगड या राज्यातील तपासणी नाके हटविण्यात यावेत अन्यथा, २ ऑक्टोंबरपासून वाहतूकदार संपावर जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी सुरेंद्र बोळाज, महेश पाटील, नागेश म्हारगुडे, प्रितेश कोठारी आदी उपस्थित होते.