सोलापूर : बार्शी शहरात बनावट चलनी नोटा तयार करून त्या व्यवहारात चालविण्यासाठी आलेल्या सात जणांना बार्शीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यापैकी एकाला दहा वर्षे व इतर सहा जणांना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

या बनावट चलनी नोटांचा प्रमुख सूत्रधार मानला गेलेला ललित व्होरा यास दहा वर्षे सक्तमजुरीची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर सुनील कोथिंबिरे, आदित्य सातभाई, नितीन बगाडे, खालीद शेख, जमीर सय्यद आणि विजय वाघमारे यांना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीची आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बार्शीत तेलगिरणी चौकासारख्या वर्दळीच्या भागात बनावट चलनी नोटा व्यापारी आणि नागरिकांना खपविण्यासाठी आलेल्या सुनील कोथिंबिरे आणि आदित्य हातभार अशा दोघांना अगोदर पकडण्यात आले. त्यानंतर त्यांची टोळी सापडली त्यातून आणखी पाच जणांचा छडा लागला. पोलीस तपासात खालीद शेख आणि विजय वाघमारे या दोघांना बीड जिल्ह्यातील परळी येथून पकडण्यात आले. मुख्य सूत्रधार ललित व्होरा आणि नितीन बगाडे यांना मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथील राहत्या घरातून पकडण्यात आले. तपास अधिकारी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी २० जुलै २०२३ रोजी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

यावेळी आरोपींच्या घरातून बनावट चलनी नोटांसह प्रिंटर, नोटा तयार करण्यासाठी लागणारे कागद, नोटांसाठी लागणारे इतर साहित्य असा ऐवज हस्तगत करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांच्या समोर झाली. यात सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, आरोपींनी केलेला गुन्हा देशाची आर्थिक बाबींसाठी अपायकारक आहे. त्यादृष्टीने आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी ॲड. देशमुख यांनी केली.

अलिकडे टेंभुर्णी, करमाळा भागातही बनावट चलनी नोटा व्यवहारात खपविण्यासाठी एका टोळीला जेरबंद करण्यात आले होते. या टोळीचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि कर्जत तालुक्यात सापडले होते. या टोळीकडून सुमारे ६६ लाखांच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा, प्रिंटर, नोटा तयार करण्यासाठी लागणारे कागद, शाई आदी साहित्यही जप्त करण्यात आले होते. यातील करमाळा तालुक्यातील आरोपी असलेल्या एका तरूणाला यापूर्वी २०२२ साली कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट चलनी नोटा खपविताना पकडण्यात आले होते. त्यास जामीनवर सोडण्यात आले असता त्याने आपला उद्योग पुन्हा सुरू केल्याचे दिसून आले.