रत्नागिरी : बारसूच्या परिसरात ग्रामस्थांनी अचानक काढलेला मोर्चा रोखताना पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतरही त्यांनी परिस्थिती संयमाने हाताळली. त्यामुळे संघर्ष टळला, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले.

बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी ‘ड्रिलिंग’चे काम गेल्या मंगळवारपासून सुरू झाले. त्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. गेल्या शुक्रवारी या आंदोलकांनी अचानक ‘ड्रिलिंग’चे काम सुरू असलेल्या ठिकाणाकडे धाव घेतली. त्या वेळी झालेल्या घटनांबाबत माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले की, अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून या परिसरात पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आला. या पोलीस कर्मचारी -अधिकाऱ्यांनी लगेच पुढे होत आंदोलकांना रोखले. त्या वेळी झालेल्या झटापटीत काही आंदोलकांनी महिला पोलिसांच्या हातातील काठय़ा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तर, काही महिला आंदोलक पुरुष पोलिसांचा पाय ओढून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत होत्या. यामध्ये काही महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. काही आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले फलक अंगावर लावले होते. 

काही आंदोलकांनी तेथील सुकलेल्या गवताला आग लावली. आगीमध्ये सापडून महिला आंदोलक किंवा पोलीस यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकला असता. हा गंभीर गुन्हा आहे.  उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्यासह सहा महिला पोलीस कर्मचारी यावेळी जखमी झाल्या आहेत, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.