करोना संसंर्ग रोखण्यासाठी गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींची राहण्याची सोय लोकवस्तीपासुन दूर शेतात किंवा इतर ठिकाणी करावी असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तरीही दोन गावांमध्ये पुणे येथून आलेल्या व्यक्तीला प्रवेश दिला, प्रशासनाला कळवले नाही. त्यामुळे दोन सरपंचांना पोलिसांनी गुन्हे का दाखल करू नयेत? अशी नोटीस बजावली आहे. आता सरपंचांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.
बीड पोलिसांनी मंगळवार दि.28 एप्रिल रोजी जयगाव , कौडगाव हुडा ( ता.परळी ) येथील सरपंचांना नोटीस बजावली आहे. दोन्ही गावच्या सरपंचांनी पुण्याहुन आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश दिल्याने गुन्हा का दाखल करू नये ? अशी नोटीस पोलीस प्रशासनाने संबंधीतांना दिली असून तातडीने खुलासा मागविला आहे.
जयगाव ( ता.परळी ) येथे पुणे येथुन आलेल्या व्यक्तीला प्रवेश दिला व त्याला गावामध्ये राहण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध केलेला नाही. सदर व्यक्तीला कोरोना आजाराचे लक्षणे आढळुन आल्याने सध्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. एक जबाबदार लोकसेवक आणि जिल्हाधिकार्यांचे आदेश असतांनाही बाहेरून आलेल्या व्यक्तीला गावामध्ये प्रवेश दिला. याबाबत पोलिसांना कळविले नाही , असे स्पष्ट करत कर्तव्यात अत्यंत निष्काळजीपणाचे व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याप्रकरणी आपल्या विरूद्ध गुन्हा का दाखल करण्यात येवू नये ? याबाबत खुलासा मागविला आहे. तसेच, कौडगाव हुडा येथील सरपंचांनाही याच स्वरूपाची नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या नोटीसमुळे यापुढे बाहेरचा व्यक्ती गावात आल्यास सरपंचांवर कारवाई होणार असल्याने खळबळ उडाली आहे. गावच्या लोकप्रतिनिधींना आता अधिक सतर्क राहणे आवश्यक असून केवळ गावच्या सीमाच नव्हे तर अन्य पांदण, छुप्या रस्त्यांवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
