Beed Police : बीडच्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. डिसेंबर महिन्यात ही घटना घडली. यानंतर या हत्याप्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा संशय ज्याच्यावर आहे तो वाल्मिक कराडही ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. यानंतर चर्चा सुरु झाली ती बीड शहर पोलीस ठाण्यात आलेल्या पलंगांची. रोहित पवार यांनी पोस्ट करत हे पलंग आरोपींसाठी मागवले आहेत का? असा सवाल केला. विजय वडेट्टीवार यांनीही प्रश्न उपस्थित केला. ज्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं आहे?

“बीड पोलीस ठाण्यामध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत”, असं रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा”, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. यामध्ये रोहित पवारांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोख कोणावर आहे हे स्पष्ट झालंच.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात असल्याच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. वडेट्टीवार म्हणाले की, “पोलिस स्टेशनध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलीसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलीस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे”. दरम्यान हे पलंग कुठल्याही आरोपीसाठी नाहीत असं पोलिसांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “बीड पोलीस ठाण्यात पाच नवे पलंग कशासाठी मागवले?”, रोहित पवारांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले अप्पर पोलीस अधीक्षक?

बीड शहर पोलीस स्टेशन नव्याने बांधण्यात आलं आहे. आम्ही साधारण महिन्याभरापूर्वी जुन्या पोलीस ठाण्यातून नव्या पोलीस ठाण्यात स्थलांतर केलं आहे. पोलीस अधिकारी, अंमलदारांसाठी ज्या सुविधा आहेत, त्या पुरवण्याचं कामही सुरु आहे. आरोपींसाठी जे गार्ड असतात ते २४ तासांसाठी असतात. त्या गार्डना आराम मिळावा म्हणून रेस्ट रुम असतात. त्यांनी आम्हाला विनंती केली होती की आमच्यासाठी आराम करण्याची खोली आहे पण पलंग नाहीत. त्या अनुषंगाने मी इथल्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती की गार्ड्सच्या आरामासाठी पलंगांची सोय करण्यात यावी. त्यानुसार आम्ही हे पलंग मागवले आहेत. वाल्मिक कराड किंवा कुठल्याही आरोपींसाठी आम्ही पलंगांची वगैरे सोय केलेली नाही. असं अप्पर पोलीस आयुक्त सचिन पांडरकर यांनी माध्यमांना सांगितलं.