राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला. यावेळी राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण न वाचता अचानक भाषण संपवलं. दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ झाला. मात्र त्यापूर्वी कालच महाराष्ट्र काँग्रेसने राज्यपालांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा ट्विटरवरुन निषेध केला.

“काय ते हातवारे, काय ते हसणं… सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव,” असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलंय.

नक्की वाचा >> Maharashtra Budget Session: …म्हणून आदित्य ठाकरेंची विधानभवनातील एन्ट्री ठरतेय चर्चेचा विषय

या ट्विटसोबत राज्यपालांच्या भाषणातील एक क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. सावित्रिबाई पुतळा अनावरण सोहळ्यामधील राज्यपालांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये राज्यपाल हे सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला असं राज्यपाल हसत हातवारे करताना सांगताना दिसतंय. त्यांचे पती १३ वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं. याच वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केलाय.

नक्की वाचा >> Maharashtra Session: ‘दाऊद के दलालो को… जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?…’; भाजपाची घोषणाबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नवाब मलिक प्रकरणाबरोबरच, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य, दाऊद प्रकरण यासारख्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने दिसतील. बुधवारीच पत्रकार परिषदेमध्ये हे सरकार दाऊद समर्पित असल्याची टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिले होते. तर दुसरीकडे भाजपा सरकारच्या काळातील घोटाळेबाजांवर कारवाईचा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडून जोरदार प्रत्युत्तराचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे यंदाचं अधिवेशन चांगलच गाजण्याची चिन्हं दिसत आहेत.