कराड : ‘ज्ञान, भक्ती, कर्म अन् साधना या चार अंगांनी समाजातील सज्जन व्यक्ती योगदान देतात. मात्र, या सर्वांचा संगम असलेलाच खरा योगी. अन् छत्रपती शिवाजी महाराज हे असेच एकमेकांमध्ये गुंफलेले चारही गुणांचे मूर्तिमंत रूप होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी त्यांना ‘श्रीमंत योगी’ ही उपाधी दिल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी केले.

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने प्रसिद्ध विचारवंत (कै.) साने गुरुजीलिखित ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय’ आणि ज्येष्ठ पत्रकार ज. सी. करंदीकरलिखित ‘श्री समर्थ चरित्र’ या ग्रंथांचे प्रकाशन कराडमध्ये भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. शिवरायांचे कार्य सर्वदूर जावे, या उद्देशाने मराठीसह हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथमहाराज कोटणीस होते. मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी, विचारवंत डॉ. अच्युत गोडबोले, कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष जोशी, दिलीप गुरव, विक्रमसिंह मोहिते आदी उपस्थित होते.

‘श्रीमंत योगी’ ही चार गुणांची संगती सांगताना जोशी म्हणाले, की समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना उद्देशून लिहिलेलं पत्र केवळ इतिहास नव्हे, तर समाजाला दिलेला आदर्शाचा आरसा आहे. त्यातील प्रत्येक शब्द हे ‘श्री शिवचरित्र’ ग्रंथाचे मूर्त स्वरूप आहे. भारत शक्तिशालीच. पण, त्याची ही शक्ती संहारक नसून, संरक्षक आहे. आज देश विविध क्षेत्रांत प्रगती करतो आहे. आपण त्याचे केवळ साक्षीदार न राहता सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

भारत ही पुण्यभूमी, देवभूमी, पराक्रमी पुरुष आणि संतांची कर्मभूमी आहे. अनेक आक्रमणांतून आणि गुलामगिरीतून मार्ग काढत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रूपाने साडेतीनशे वर्षांपूर्वी इतिहासाच्या सुवर्णपानाची सुरुवात झाली. या सुवर्णकाळाचे लेखन समर्थ रामदास स्वामींनी केले असून, भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिवसमर्थ परंपरेचे अमूल्य योगदान असल्याचे जोशी यांनी सांगितले.

‘श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींचा उद्देश केवळ धार्मिक नव्हता. सज्जन समाज हा दुर्बल असू नये, त्यांच्या मनातही पराक्रमाची ज्वाला पेटावी, हेच समर्थांचे खरे ध्येय होते,’ असे भैयाजी जोशी यांनी सांगितले.

प्रास्ताविकात योगेशबुवा रामदासी म्हणाले, ‘शौर्याचे तेज अन् भक्तीचे तेज एकत्र आले, तेव्हा शिवकालात अलौकिक इतिहास घडला. म्हणूनच शिवराय व समर्थ यांचे चरित्र प्रकाशित करण्यासाठी कराडनगरीची निवड करण्यात आली. कारण ही दोन नद्यांच्या प्रीतीसंगमावर वसलेली, ऐतिहासिक नगरी आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समर्थ भक्तांचा सन्मान

सातारा जिल्ह्यात धर्मप्रसार अन् सेवा कार्यात सक्रिय असलेल्या समर्थ भक्तांचा सन्मान भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. कराड अर्बन बँकेच्या वतीने सुभाष जोशी आणि दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सन्मानकार्य पार पाडले.