शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (१४ सप्टेंबर) प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वत: विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी घेत आहेत. एकाच दिवशी शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांची सुनावणी घेतली जाईल. यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्याबाबत विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. दोन्ही गटांनी सादर केलेले पुरावे आणि प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून तसेच दोन्ही गटातील आमदारांची मतं ऐकल्यानंतर राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल देतील. दरम्यान, या सुनावणीत पक्षाच्या मुख्य प्रतोदाचा (व्हीप) मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे.

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. परंतु, खरी शिवसेना कोणती आणि प्रतोद (व्हीप) कोणाचा राहणार? हा मुद्दा अनुत्तरीतच राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे की शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू हे पक्षाचे प्रतोद म्हणून ग्राह्य धरायला हवेत. त्यामुळे खरा प्रतोद (व्हीप) कोण असेल याबाबतही राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यावा लागणार आहे. यावर शिवेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे.

आमदार अपात्रतेसंदर्भात होणाऱ्या सुनावणीसाठी आमदार भरत गोगावले काही वेळापूर्वी विधान भवनात दाखल झाले. यावेळी गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. गोगावले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू हेच प्रतोद म्हणून ग्राह्य धरले जावेत, आजच्या सुनावणीत हा कळीचा मुद्दा ठरेल का? त्यावर भरत गोगावले म्हणाले, मला असं वाटत नाही. परंतु, हा जर कळीचा मुद्दा ठरला तर आम्ही त्याला सामोरे जाऊ. त्याची काही काळजी करण्याची गरज नाही.

हे ही वाचा >> हे ही वाचा >> “लोकसभेवेळी कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या दाव्यावर यशोमती ठाकूर संतापल्या, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार भरत गोगावले म्हणाले, “आम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षांचाही अवमान करणार नाही. जो काही निर्णय ते घेतील, त्याला आम्ही सामोरे जाऊ. काही काळजी करण्याची गरज नाही.” आमदार भरत गोगावले यांना दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या उत्तराबद्दल विचारलं. त्यावर आमदार गोगावले म्हणाले, आम्ही ६,००० पानांचं उत्तर दिलं आहे. त्यांनी (ठाकरे गट) ५०० पानांचं उत्तर दिलंय. याचा अर्थ आम्ही परिपूर्ण असं उत्तर दिलंय आणि त्यांनी अपूर्ण उत्तर दिलं असेल. ६,००० पानं कुठं आणि ५०० पानं कुठं? फरक आहे ना? त्यामुळे अध्यक्ष देतील तो निकाल आम्हाला मान्य असेल. आजच्या सुनावणीत आम्हीच खरी शिवसेना असल्याचे पुरावे देणार आहोत. आमच्याकडे पुरावे नसते तर आम्ही या सुनावणीला सामोरे गेलो नसतो.