Bharatshet Gogawale on Dance Bar : शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन शनिवारी (२ ऑगस्ट) पनवेल येथे पार पडला. शेकापच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात नवी मुंबई व पनवेल शहरातील तसेच रायगड जिल्ह्यातील डान्स बारचा विषय मांडला. राज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारच्या वाढत्या संख्येवरून महाराष्ट्र सैनिक व जनतेसमोर चिंता व्यक्त केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सैनिक डान्स बारविरोधात आक्रमक झाले आहेत.

रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडलं. असं असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. बारच्या जागी अनधिकृत डान्सबार कसे सुरू होतात आणि इथलं प्रशासन त्याकडे डोळेझाक का करतंय? असा प्रश्न राज यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला. राज यांच्या इशाऱ्यानंतर अवघ्या नऊ तासांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या एका लेडीज बारची तोडफोड केली.

सगळीकडेच हिडिस-फिडिस गोष्टी चालत नाहीत : भरत गोगावले

दरम्यान, मनसेच्या आंदोलनावर राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा रायगडमधील महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोगावले म्हणाले, “बार तर आख्ख्या महाराष्ट्रात आहेत, परंतु, सगळीकडेच हिडिस-फिडिस गोष्टी चालत नाहीत.”

मंत्री गोगावले म्हणाले, “ज्या बारमध्ये गैरवर्तन होत असेल, चुकीच्या गोष्टी होत असतील, तो भाग वेगळा आहे. बार तर अख्ख्या महाराष्ट्रात आहेत. परंतु, ते बार कोणत्या प्रकारचे आहेत, तिथं काय चालतं ते समजणं फार गरजेचं आहे. मुळात बार म्हणजे काय? खाण्या-पिण्यासाठीचे बारही असतात. सगळ्याच बारमध्ये नाचगाणी चालतात अशातला काही भाग नाही. अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्रा चालतात. परंतु, तिथे काही चुकीचं घडत असेल तर सरकार त्या बारवर कारवाई करून बंदी आणेल. करमणुकीच्या काही गोष्टींना परवानगी आहे. सगळ्या बारमध्ये हिडीस फिडिस काही दाखवलं जात नाही.”

मनसेचं खळ्ळखट्याक

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शनिवारी मध्यरात्री १२ वाजता, मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील कोन गावातील नाईट रायडर या लेडीज सर्व्हीस बारवर धडक दिली, हातामध्ये काट्या व दंडुके घेऊन संतप्त महाराष्ट्र सैनिकांनी हा बार फोडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या अगदी काही अंतरावर हा बार रात्री उशिरापर्यंत चालू असल्याचे या कारवाईमुळे उघडकीस आले.