Bhau kadam Star Campaigner of NCP Ajit Pawar : निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षांकडून सिने क्षेत्रातील कलाकारांना पाचारण केलं जात आहे. काल (४ नोव्हेंबर) ठाण्यात झालेल्या मनसेच्या सभेत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उपनेते शरद पोंक्षे हजर होते. तर, आजपासून चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा प्रचार करणार आहे. भाऊ कदम या पक्षाचा अधिकृत स्टार प्रचारक असणार आहे. परंतु, त्याने अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्याने एबीपी माझाशी साधलेल्या संवादात याबाबत माहिती दिली.

भाऊ कदम म्हणाला, अजित पवारांबरोबर माझी सदिच्छा भेट झाली. अजित पवार कलाकारांना मान देणारे आणि त्यांचे प्रश्न सोडवणारे नेते आहेत. त्यांनी आताच अनुदानाचा प्रश्न सोडवला. कलाकारांच्या समस्या पूर्णत्वास न्यायचे असतील तर ते चांगले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला जायला काहीच हरकत नाही. त्यांनी आमच्यासाठी केलं आहे तर आम्हीही त्यांच्यासाठी प्रचार करणार.”

“अजित पवारांना भेटल्यानंतर त्यांनी मलाच चला हवा येऊ द्या किस्से सांगितले. आमचे व्हिडिओ पाहून खूश होतात असं म्हणाले. त्यानंतर आम्ही गप्पाही मारल्या”, असं भाऊ कदम म्हणाला.

हेही वाचा >> Uddhav Thackeray Manifesto : सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन् जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर दर; राधानगरीच्या सभेत ठाकरेंनी कोणती वचने दिली?

अद्याप पक्षप्रवेश नाही

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अद्याप पक्षप्रवेश झाला नसल्याचं भाऊ कदमने स्पष्ट केलं. पण तो पुढे असंही म्हणाला की पक्षात जाण्यास हरकत नाही. परंतु, इंडस्ट्रीमध्ये अजून खूप कामं करायची आहेत. दादा आमच्या पाठीशी आहेत. मी जरा लोकांचं मनोरंजन करतो, दादा आमचं मनोरंजन करतील.”

प्रचाराचं नियोजन कसं असणार?

“सुनील तटकरे आणि सिद्धार्थ कांबळे आता प्रचाराचं शेड्युल ठरवतील. मी कोणत्या भागात जायला हवं याबाबत सांगितलं जाईल. तिथे जाऊन मी प्रचार करणार आहे”, असं भाऊ कदम म्हणाला.

अजित पवारांविषयी भाऊ कदमला काय वाटतं?

“एकच वादा, अजित दादा. त्यांची काम करण्याची पद्धत अफलातून आहे. ते सकाळपासून काम करत असतात. असाच नेता हवा जे सतत काम करत असतात. त्यांच्या कामाकडे लक्ष ठेवून आहे. ते या महाराष्ट्राला पुढे नेतील अशी आशा आहे”, असा विश्वासही भाऊ कदमने व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांची कोणती गोष्ट भावली

अजित पवारांनी आणलेली लाडकी बहीण योजने खूप चालली. अशी योजना आणणारे ते पहिलेच नेते आहेत. त्यांनी राज्यातील बहिणींचा विचार केला. तसंच, आमच्या क्षेत्रातील अनुदानाची समस्या त्यांनी सोडवली. ती फाईल अशीच पडून होती. पण त्यांनी काम केलं. त्यामुळे अशा कामांतून आम्हाला दिलासा मिळाला आहे. ते यापुढेही अशीच खूप मदत करतील”, असं भाऊ कदम म्हणाला.