भीमा कोरेगाव येथील दंगल प्रकरणी अटकेत असलेले हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुण्यातील सत्र न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर हे आदेश देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भीमा कोरेगाव येथील दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना तीन दिवसांपूर्वी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना २१ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर बुधावारी त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, कोर्टाने एकबोटेंना १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावली. एकबोटेंना तीन दिवसापूर्वी न्यायालय परिसरात एका तरुणाने काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एकबोटे यांच्या समर्थकांनी काही काळ न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला. तसेच काही जणांनी मिलिंद एकबोटेंवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. यापार्श्वभूमीवर आज न्यायालय परिसरात चोख  सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा या ठिकाणी दोन गटांमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांची चिथावणी कारणीभूत होती असा आरोप झाला. तसेच या दोघांविरोधात हिंसा भडकवण्याचे गुन्हेही दाखल झाले. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली.

१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करून येताना दलित बांधवांवर दगडफेक झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांची चिथावणी असल्याचे समोर आले त्यानंतर भारीप बहुजन महासंघाने मुंबई बंदचीही हाक दिली होती. तसेच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक झाली आहे. तर संभाजी भिडे यांना अटक न केल्यास २६ मार्चला मुंबईत मोर्चा आणणार असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhima koregaon violence milind ekbote sends 14 days judicial custody
First published on: 21-03-2018 at 16:12 IST