बहुचर्चित भोंदूबाबा व स्वत:ला बाळुमामा यांचा वंशज समजणार्‍या मनोहर उर्फ मामा भोसले यास पुणे ग्रामीण पोलिसांनी फलटण तालुक्यातील सालपे येथे अटक केली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल असतानाच पुणे ग्रामीणमध्ये त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्याने त्याला अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

सद्गुरु बाळुमामांचा वंशज व अवतार असल्याचे सांगून मनोहर उर्फ मामा भोसले (वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याने राज्यातील अनेकांना बुवाबाजी करुन गंडा घातलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोहर मामाच्या अनेक लीला बाहेर येत आहेत. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील सद्गुरु बाळुमामा देवस्थानच्यावतीने मनोहर भोसलेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतानाच बारामतीतही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

“त्यांच्या गुंडांनी मला पाठीमागून लाथ मारली”, महिला सरपंचाचे गंभीर आरोप! रुपाली चाकणकरांनी ट्वीट केला व्हिडीओ
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, बारामतीतील शशिकांत सुभाष खरात यांच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव केला. तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, गुरुवारी मनोहर भोसले विरोधात करमाळ्यात महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली. यानंतर मनोहर भोसले फरारी होते. पोलिसांना केलेल्या तपासात तो सालपे, ता. फलटण, जि. सातारा येथे असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढमाळ, सपोनि संदीप येळे, पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननावरे, पो.हवा. विजय कांचन, अजय घुले, राजु मोमीन, धीरज जाधव यांच्या पथकाने सालपे येथे धाड टाकून मनोहर भोसले यास अटक केली. मनोहर भोसले या भोंदूबाबास अटक झाल्याने त्याचे अनेक कारनामे यापुढे बाहेर येणार आहेत.