लातूर: कोणाच्या मतदार संघातून रस्ता जातो आहे याचा विचार न करता राज्याच्या हितासाठी जे आवश्यक आहे त्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, भले तो कोणाच्याही मतदारसंघातून जावो. राज्य शासनाच्या वतीने यापुढे या धोरणानेच काम होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीच्या लोकाप लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीप शेख कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ उपस्थित होते.

भोसले म्हणाले गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते, राज्य व राष्ट्रीय मार्गाना जोडणारे रस्ते, विमानतळाला जोडणारे रस्ते याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल .शंभर दिवसांमध्ये राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा क्रमांक दुसरा आला आहे. ७७.९५गुण या विभागाला मिळालेले आहेत. या विभागाच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे सुरू करण्यात आले असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर रस्त्याच्या बांधकामामध्ये व दुरुस्तीमध्ये केला जाणार आहे. याचा लाभ अतिशय उत्कृष्ट होतो हे सार्वजनिक बांधकाम विभागाने लातूरमध्ये सक्षमपणे करून दाखवले असल्याचे भोसले म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारे कंत्राटदार यांनी शंभर दिवसांमध्ये त्यांची मागील बिले काही प्रमाणात थकीत असतानाही उत्तम दर्जाचे व चांगले काम केले आहे. मार्च अखेर ९हजार कोटी रुपयांची देयके देण्यात आली आहेत, उर्वरित शिल्लक देयके ही लवकरच देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे भोसले म्हणाले. राज्यातील पाच वर्षात सर्व विभागाची कामे १०० दिवसाचे जे उद्दिष्ट दिले होते त्याचप्रमाणे पुढे चालू राहणार आहेत कामाला गती द्यायची, सामान्यांचे प्रश्न त्वरेने सोडवायचे याला प्राधान्य दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार भोसले यांनी केला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्ह्यात सर्वच विभाग अतिशय गतिमान पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. प्रारंभी अधीक्षक अभियंता सलीम शेख यांनी लातूर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. १०० दिवसांमध्ये जिल्ह्यात आठ नव्या इमारती बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते त्या सर्वच्या सर्व आठ इमारती बांधून पूर्ण झालेल्या आहेत. ४४ रस्ते व १५६किलोमीटर कामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते तेही आपण पूर्ण केले आहे गेल्या तीन वर्षात ४७ इमारती व ७५० किलोमीटर रस्त्याची सुधारणा हे उद्दिष्ट दिले आहे तेही पूर्ण झाले आहे .

लातूर सार्वजनिक बांधकाम हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा देशातील पहिला विभाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केवळ ९० मिनिटांमध्ये जिल्ह्यातील रस्त्यांची सद्यस्थिती कळते, खड्डे कुठे आहेत? रस्ता नादुरुस्त कुठे आहे? त्यानुसार त्या रस्त्याची दुरुस्ती करता येते. लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा अभिनव उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असल्याचे ते म्हणाले.

लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली

लातूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे ,आ. विक्रम काळे, आ.सतीश चव्हाण, आ.अमित देशमुख ,आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ.संजय बनसोडे, आ.अभिमन्यू पवार व आ.रमेश कराड यांची नावे पत्रिकेवर होती मात्र यापैकी एकांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली नाही त्याची चर्चा या कार्यक्रम प्रसंगी होती.