भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यानाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे.  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कामगारांची भविष्य निधीची रक्कम जमा न केल्याने, या कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

औरंगाबादचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने वैद्यनाथ कारखान्याचं बँक खातं सील केलं आहे. एवढच नाहीतर त्यातून ९२ लाख रुपये जप्त देखील करण्यात आलेले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही रक्कम न भरण्यात आल्याने कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे व त्यातून रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशी माहिती औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आय़ुक्त जगदीश तांबे  यांच्याशी बोलताना एबीपी माझाशी दिली आहे.

कारखान्याने २०१८ ते ऑगस्ट २०१९ कालावधीत पीएफची रक्कम भरणा केली नव्हती. पीएफपोटी थकीत रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली, उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाते जप्त झाले नाही ; हा केवळ राजकीय खोडसाळपणा – कार्यकारी संचालकांचे स्पष्टीकरण

तर, परळी तालुक्यातील पांगरी येथीलवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेले वृत्त चुकीचे असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी.एस. दीक्षितूलू यांनी म्हटले आहे. दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारचे वृत्त देणे आणि शेतकर्‍यांचे भवितव्य धोक्यात आणणं हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.