विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपताच राज्यात एक मोठी घडामोड घडली असून शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनीदेखील या युतीचं स्वागत केलं असून मराठ्यांना असलेल्या दुहीच्या शापालाच आपण गाडून टाकू, असं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर भाजपाकडून खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड

भाजपासोबत युती तोडल्यापासून शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेनं युती केल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यासंदर्भात लवकरच दोन्ही पक्षांच्या युतीची पुढील वाटचाल कशी असेल, याबाबत माहिती दिली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी जाहीर केलं. “मी या युतीचं स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Video : “संघाची विचारसरणी भाजपाला मान्य आहे का? मोहन भागवतांनी…”, उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

“ठाकरेंसोबत कुणीही युती करायला तयार नाही”

दरम्यान, या घडामोडीवर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. “संभाजी ब्रिगेडने २०१९मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्राला आव आणून सांगत आहेत. पण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे”, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फडणवीस आणि शिंदे असे बॅट्समन आहेत की..”

“आम्हाला काहीही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे बॅट्समन आहेत की जेव्हा क्रिकेटचा खेळ सुरू होईल, एवढे चौकार आणि षटकार लागणार आहेत की महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड असे सगळे गारद होतील आणि प्रचंड बहुमताने खूप धावा करून आम्ही ही मॅच जिंकू”, असं बावनकुळे म्हणाले.