विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी नागपुरात बोलताना सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना यावर परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, अजित पवारांवर खोचक शब्दांत टोलाही लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांच्या करेक्ट कार्यक्रम वक्तव्याचा समाचार घेतला. “खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. मी दाव्यानं सांगतो की बारामती शहर सोडता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या वागण्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

“आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत…”

“बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे.माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल”, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

“अजित पवारांचं आव्हान स्वीकारायला तयार”

दरम्यान, यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आहे. “अजित पवारांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. अजित पवार आम्हाला माहिती आहे की वेळप्रसंगी आठ आठ दिवस मोबाईल बंद करून पळून जातात. अंडरग्राऊंड होतात. कधी रडतात. असे अजित पवार बघितले आहेत आम्ही. त्यामुळे अजित पवारांनी विदर्भात आम्हाला आव्हान देऊ नये. त्यांचं कोणतंही, कोणत्याही पातळीवरचं आव्हान स्वीकारायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे इथून पुढे नागपुरात अजित पवारांनी अशी भाषा करू नये”, अशा शब्दांत बावनकुळेंनी अजित पवारांना आव्हान दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrashekhar bawankule slams ajit pawar ncp baramati news pmw
First published on: 28-12-2022 at 13:37 IST