​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची ‘महायुती’ होईल, अशी चर्चा होती. मात्र, आता भाजपने ‘स्वबळा’चा नारा दिल्याने जिल्ह्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

​भाजपचा निर्धार: ‘कमळा’वर निवडणूक! बुधवारी सावंतवाडी येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा पक्षाचा निर्धार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश राणे हेही उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांनीही मैत्रिपूर्ण लढत होईल असे म्हटले आहे.भाजपने स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतल्यामुळे महायुतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

​शिंदे गटाची महायुतीची अपेक्षा… पण ‘एकला चलो’ची तयारी यापूर्वी शिवसेना (शिंदे गट) चे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी महायुतीसाठी बोलणी करण्याची तयारी दर्शवली होती.आज आमदार दीपक केसरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, त्यांनी आणि आमदार निलेश राणे यांनी युतीसाठी ‘ऍडजेस्टमेंट’ करण्याची तयारी ठेवली होती. परंतु, “भाजपला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर शिवसेनाही (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार आहे.” ​यावेळी त्यांनी सावधगिरीचा इशारा देत म्हटले आहे की, जर या दुफळीचा फायदा उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) गटाला झाला, तर त्याची जबाबदारी भाजपने घ्यावी लागेल.

​बंडखोरी रोखण्यासाठी ‘मैत्रीपूर्ण’ लढत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या कालावधीनंतर होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरी रोखण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याचे सुतोवाच केले आहे. तर, आमदार दीपक केसरकर यांनीही ‘मैत्रीपूर्ण’ किंवा ‘स्वबळा’वर निवडणूक झाली तरी, उबाठाला फायदा होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. आता खासदार नारायण राणे यांची या संपूर्ण प्रकरणातील भूमिका काय असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील महाविकास आघाडीचा फाॅर्मुला अद्याप तरी समोर आलेला नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे शिवसेना पक्ष ताकदीने लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस, मनसे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणावे तसे प्राबल्य नसल्याने भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत लढत होईल असे चित्र आहे.