राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली असून यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. राज्यपाल विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यपाल देहरादूनला जात असताना हा प्रकार घडला. यानंतर राज्यपाल खासगी विमानाने प्रवास करणार असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहरादूनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले असता उड्डाणाची परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं. राज्य सरकारच्या विमानाने ते देहरादूनला जाणार होते. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आणखी वाचा- राज्यपालांना ठाकरे सरकारने विमानातून उतरवलं?; जाणून घ्या नेमकं काय झालं?

“अत्यंत दुर्दैवी प्रकार असून महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमतात असं आपल्या संविधानानं सांगितलं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं विमान वापरायचं असेल तर जीएडीला एक पत्र पाठवावं लागतं आणि नंतर परवानगी मिळते अशी पद्धत आहे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे अशाप्रकारे पूर्ण कार्यक्रम जीएडीला गेला. मुख्य सचिवांना याची माहिती होती, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं हा पोरखेळ आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

आणखी वाचा- “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसला एकमेकांच्या निर्णयाची माहिती नसते”; भाजपाचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या सरकारएवढं अहंकारी सरकार मी पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत अहंकार आणणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नसून राज्याची आहे. ज्याप्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहे ते पाहता महाराष्ट्रात यासारखं सरकार आम्ही याआधी पाहिलेलं नाही. पोरखेळ लावला आहे. रस्त्यावरची भांडणं असल्यासारखं राज्य सरकार वागत आहे. यामुळे राज्यपालांचं काही वाईट होणार नाही, पण राज्याची प्रतिमा मलीन होत आहे,” असंही ते म्हणाले आहेत. “जनतेला सर्व समजतं, जनताच याबद्दल निकाल देईल. हे सरकार किती अहंकारी आहे हे आज स्पष्ट झालं आहे,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.