विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे सर्वच पक्षांकूडन खास खबरदारी घेतली जात आहे. काहीही झालं तरी आमचेच पाच उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून केला जातोय. तर दुसरीकडे निवडणूक चुरशीची होणार असली तरी आमचा विजय होणार असं महाविकास आघाडीकडून म्हटलं जात आहे. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे थेट नाव न घेता या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याबद्दल भाकित केलं आहे.

हेही वाचा >> दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी! राहुल गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेसचे शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपतींची भेट

“काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,” असं सूचक ट्वीट अनिल बोंडे यांनी केले आहे. बोंडे यांच्या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला असून अनेकजण आपापल्या पातळीवर बोंडे यांच्या ट्वीटचा अर्थ लावत आहेत.

हेही वाचा >> विधान परिषद निवडणूक : शिवसेना आमदारांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले…

दुसरीकडे विधान भवनात विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खास योजना आखली आहे. तसा दावा तिन्ही पक्षाचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कोणत्याततरी एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे, असा दावा भाजपाचे नेते करत आहेत.

हेही वाचा >> विधान परिषद निवडणूक : ‘…म्हणूनच त्यांनी पराभवाची स्क्रीप्ट अगोदरच तयार केली,’ चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून सायंकाळी या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. सध्यातरी प्रत्येक पक्ष आमचे सर्व उमेदवार विजयी होणार असा दावा करत आहेत. मात्र या लढतीमध्ये कोण सरस ठरणार हे निकाल स्पष्ट झाल्यावरच समजणार आहे.