नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची आज पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जाणार आहे. याआधी त्यांची सगल तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांची चौकशी सुरु असताना काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या भेटीत दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेत्यांसोबत केलेल्या गैरव्यवहाराची माहिती कोविंद यांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> हिंसक आंदोलकांना ‘अग्निपथ’ची दारे बंद ; भरती प्रक्रियेबाबत तिन्ही दलांची घोषणा, वेळापत्रकही जाहीर

राहुल गांधी यांना ईडीने चौकशीच्या चौथ्या टप्प्यासाठी १७ जून रोजी हजर राहण्याचे सांगितले होते. मात्र आई सोनिया गांधी आजारी असल्यामुळे राहुल गांधी यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधी ईडी कार्यालयात जाणार असून येथे त्यांची चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा >>> ‘काका अग्निपथ योजना रद्द करा,’ सैनिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला कोसळले रडू

काँग्रेसचे जंतरमंतरवर आंदोलन

राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु झाल्यापासून काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे. राहुल गांधी ईडी कार्यालयात हजेरी लावताना काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी राजधानी दिल्ली तसेच देशभरात निदर्शने केली. आजदेखील काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात येणार आहेत. राजधानी दिल्ली येथील जंतर मंतरवर काँग्रेसचे नेते आंदोलन करणार असून यावेळी ते राहुल गांधी यांची ईडीकडून केली जाणारी चौकशी तसेच सैन्यभरतीसाठी केंद्राने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध करणार आहेत.

हेही वाचा >>> विरोधकांची युवकांना चिथावणी ; केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांचा आरोप

एकीकडे राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन करताना, दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते तसेच काही खासदारांसोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याच कथित गैरव्यवहाराची माहिती काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती कोविंद यांना देणार आहे.

हेही वाचा >>> “भाजपा कार्यालयामध्ये सुरक्षारक्षक ठेवायचा असेल तर अग्निवीरला प्राधान्य देऊ”; कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य

दरम्यान, आज राहुल गांधी ईडीसमोर हजर होणार असून आजदेखील दिल्ली तसेच देशभरात काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार आहे. एकीकडे अग्निपथ या सैन्यभरतीसाठीच्या योजनेविरोधात देशभरात आंदोलन सुरु असताना दुसरीकडे आज काँग्रेसदेखील ईडी तसेच केंद्र सरकारविरोधात आक्रमक होणार आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो.