आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यासाठी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर राज्यातले राजकारण चांगलंच तापलं आहे. आज सकाळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या एसआयटीवर टीका करत असताना केंद्र सरकारने सुरू केलेल्या रेशन पॉलिसीचा हवाला दिला. यानंतर भाजपाकडूनही राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार मैदानात उतरले. संजय राऊत यांनी बोलघेवडेपणा बंद करुन रामरक्षा म्हणावी, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आशिष शेलार यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “ज्यांच्या तोंडात सत्य बोलायची सवयच नाही. जे रोज सकाळी उठून रामरक्षा म्हणायच्या ऐवजी रावणरक्षा म्हणतात, त्यांचं नाव संजय राऊत. रोज सकाळी उठलं की रावणरक्षा म्हणत राहायची. गेल्या अडीच वर्षांमध्ये गोरगरिब जनतेसाठी केलेलं एक काम सांगा. सकाळी उठायचं बोलघेवडेपणा करायचा आणि आम्हाला विचारता आम्ही कुठे आहोत?”

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचीही माहिती यावेळी आशिष शेलार यांनी दिली. ते म्हणाले, “मोदीजींनी घेतलेल्या निर्णयांची देशभर चर्चा आहे. ८१ कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. १०७ औषधांच्या किंमती नियंत्रणात आणून सामान्य माणसांना दिलासा दिला गेला आहे. सरंक्षण खात्यातील २५ लाख अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला २३ हजार कोटींच्या वन रँक, वन पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे. गरिबांची सेवा, सैनिकांची सेवा अशी कामे पंतप्रधानांनी केली आहेत. त्यामुळे संजय राऊत तुम्ही केवळ बोलघेवडेपणा करा. रामरक्षा म्हणा, रावणरक्षा म्हणणे बंद करा.”

आशिष शेलार यांनी आणखी एक ट्विट करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरही प्रतिक्रिया दिली. दोनच दिवसांपूर्वी विधीमंडळात माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कुजबुज करताना म्हणाले की, “ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे.” त्यावर भास्कर जाधव यांनी होकार देत, “होय ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे”, असे म्हटले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली.

“म्हणून संजय राऊत यांना मिरची लागली”

हाच धागा पकडून आशिष शेलार म्हणाले की, “उद्धवजींची शिवसेना राष्ट्रवादीच्या ताटाखालची मांजर झाली आहे. तेच जयंत पाटील बोलले आणि त्याला भास्कर जाधव यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे स्वाभिमान, मर्द, मराठी, हिंदुत्व या भाषा ना संजय राऊत आता तुम्हाला झेपत, ना तुम्हाला शोभत, ते बंद करा”.

“तुम्ही SIT चं रेशन केलंय, मागेल त्याला..”, संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “तोंडावर पडाल”!

“आदरणीय बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडलेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर झालात. पण स्वाभिमानानं जे आमदार बाहेर पडले त्याची मिरची संजय राऊत यांना लागली आहे. “, असा टोला आ. आशिष शेलार यांनी लगावला.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.