Rajya Sabha Election 2024 BJP Candidate List : भाजपाने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली. अशोक चव्हाण यांनी एक दिवसापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याबद्दल प्रतिक्रिया देत असताना अशोक चव्हाण म्हणाले की, आज माझे नाव राज्यसभेसाठी जाहीर केल्यामुळे मी भाजपाचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली, त्याबद्दल मला आनंद वाटतो. या नेत्यांनी माझ्यासारख्या पक्षात नव्या आलेल्या नेत्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.

“माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी माझ्या कामातून सार्थ दाखवून देईल. राज्यसभेत सामान्य माणसाचे प्रश्न उचलणे आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहिल, हे यानिमित्ताने सांगते”, असेही अशोक चव्हाण यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

राज्यसभेसाठी भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे; पंकजा मुंडे यांचे नाव नाही

दरम्यान माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. “भाजपाने संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला जे बोलायचे आहे, ते मी बोलते. राज्यसभेवर गेले असले तरी पुणे हे माझे माहेरघर आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रश्नावर मी बोलत राहणार आहे. दिल्लीच्या सभागृहात काम करण्याचा अनुभव माझ्याकडे नव्हता. या संधीच्या निमित्ताने आज तोही अनुभव मिळणार आहे”, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

मेधा कुलकर्णींना उमेदवारी; पुण्यात लोकसभेपूर्वीची तयारी

मी खूप वर्षांपासून भाजपामध्ये काम करत आहे. याआधी दोन वेळा नगरसेवक आणि एकदा कोथरुडची आमदार म्हणून काम केले. मला काम करण्याची संधी द्या, एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती. पक्षश्रेष्ठींकडे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी योजना असतेच. मी या निर्णयामुळे आनंदी आहे, अशीही प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

कारसेवक ते आता राज्यसभेचे उमेदवार, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

भाजपाच्या उमेदवारांमध्ये अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त डॉ. अजित गोपछडे यांचेही नाव आहे. भाजपा संघटनेव्यतिरिक्त गोपछडे यांचे नाव फारसे कुणाला परिचित नव्हते. पक्ष संघटनेशी निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणून अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली असल्याचे बोलले जाते. उमेदवारी मिळाल्यानंतर गोपछडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्यावर पक्षाने जो विश्वास टाकला आहे, तो मी माझ्या कामातून सार्थ करून दाखवेन. मला मिळालेली उमेदवारी ही माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. मी अयोध्येत कारसेवेसाठी गेलो होतो, माझ्या कारसेवेचे हे फळ आहे, असे मला वाटते. मी स्वतः प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे. तसेच भाजपाच्या डॉक्टर सेलचा प्रमुख आहे. या अनुभवाचा फायदा मला राज्यसभेत होईल, अशी प्रतिक्रिया डॉ. अजित गोपछडे यांनी दिली.

ताजी अपडेट

राज्यसभा निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. कारण सर्वांकडे आप-आपला कोटा आहे. सर्वांकडे जिंकून येण्याचा कोटा असेल तर चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेण्याची गरज नाही”, असं महत्त्वाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.