आज पहाटे चारच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या या निकालानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, “भाजपा तिसरी जागा जिंकणारच होती. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला की, हा हट्ट करू नका. गेल्या २४ वर्षात महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या नाहीत. आमच्याकडे भाजपाची ३० मते आहेत, त्यामुळे तुम्ही कशासाठी हट्ट धरता. विधान परिषदेला पाचवी जागा जिंकता येते तरीसुद्धा बिनविरोध होऊ, असंही आम्ही सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही.”

देवेंद्र फडणवीस हे असं रसायन आहे की, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्याला देखील कळणं अवघड आहे. आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. ते जे सांगतील तेवढंच काम आम्ही करतो. संजय राऊतांपेक्षा आमच्या उमेदवाराला किमान अर्धा मत अधिक मिळेल, हे देंवेद्र फडणीवासांनी लक्ष्य ठेवलं होतं. त्याप्रमाणे नियोजन करत त्यांनी सहावा उमेदवार विजयी केला. त्यानुसार धनंजय महाडिकांना संजय राऊतांपेक्षा अर्धा मत (४१.५६ मते) अधिक मिळाला आहे.

हेही वाचा- “ज्येष्ठ मंत्र्यांची ९ मतं आम्ही संजय पवारांना दिली पण…”, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे महाविकास आघाडी काही शहाणपण शिकेल का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, “त्यांना फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण शिकता येत नसेल तर त्यांना तसेही फटके मिळतील. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही सहा जागा विजयी करणार. तुम्ही म्हणाल हा काय अतिआत्मविश्वास आहे. पण हा आत्मविश्वास आहे, हे एक गणित आहे. जिथे मतं दाखवून टाकावी लागतात, तिथे आम्हाला जर अकरा मतं जास्त मिळत असतील, तर विधान परिषदेत गुप्त पद्धतीने मतदान केलं जातं. त्यामुळे तेथे आम्ही सहा जागा विजयी करणार.”